
नाशिक, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्यात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून रुग्णांवर उपचारासाठी होणारा खर्च अत्यंत मोठा आहे. केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना तसेच राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचे काम सुरू असले, तरी प्रत्यक्षात कर्करोग उपचारासाठी उपलब्ध असलेली पाच लाख रुपयांची मर्यादा अपुरी पडत असल्याचा मुद्दा आमदार देवयानी फरांदे यांनी सभागृहात लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.
मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी विधीमंडळात प्रश्न उपस्थित करताना आमदार फरांदे म्हणाल्या की, उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना कर्करोगाच्या उपचारासाठी मुंबईला जावे लागते. शासनाने नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यास टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटची दुसरी शाखा उत्तर महाराष्ट्रासाठी सुरू करावी, अशी विनंती त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली. खाजगी व शासकीय रुग्णालयांत खर्चात तफावत टाटा रुग्णालयातील उपचार दर हे खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी असल्याने सामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो. शासकीय योजनांतून काही प्रमाणात मदत मिळत असली, तरी उपचारांचा संपूर्ण खर्च भागत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे कंबरडे मोडते. तसेच खाजगी व शासकीय रुग्णालयांतील खर्चातील तफावत रुग्णांना मोठा फटका देत असल्याचे आ. फरांदे यांनी सभागृहात स्पष्ट केले.
नाशिकच्या आमदारांची लवकरच बैठक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संदर्भ सेवा रुग्णालयात लवकरच कर्करोग उपचार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र, आमदार फरांदे यांनी या उत्तरावर समाधान व्यक्त न करता मर्यादित क्षमतेतील सेवा अपुरी ठरेल, असे सांगितले. उत्तर महाराष्ट्रासाठी अत्याधुनिक व पूर्ण क्षमतेचे कर्करोग रुग्णालय तसेच टाटा रिसर्च सेंटरची शाखा उभारण्यात यावी, अशी त्यांनी पुनश्च मागणी केली. तसेच नाशिकच्या सर्व आमदारांची तातडीने बैठक घेऊन हा निर्णय मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नाशिकच्या आमदारांची लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
हजारो रुग्णांना मिळेल दिला
नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र असून आरोग्य क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे येथे टाटा रिसर्च सेंटरची शाखा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील कर्करोगाच्या हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.
- देवयानी फरांदे, आमदार
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV