
रायगड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। मुंबई–पुणे एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील प्रोपलेन गॅसने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात झाला. सुदैवाने मोठा स्फोट टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रारंभी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती; मात्र पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे सध्या वाहतूक नियंत्रणात असून रहदारी सुरळीत सुरू आहे.
ही घटना खोपोली पोलीस ठाणे हद्दीत २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.५५ वाजता कि.मी. ४५/४०० जवळ घडली. टँकर क्रमांक NL 01 AF 5040 मध्ये ज्वलनशील प्रोपलेन गॅस भरलेला होता. चालकाने धोकादायक वायू वाहतुकीसंदर्भातील नियमांचे पालन न करता टँकर अतिवेगाने चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या डाव्या बाजूच्या डोंगरभागास तसेच विजेच्या खांबास धडकला.
अपघातानंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक पोलिस व संबंधित यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक वळवून मार्ग मोकळा केला. प्राथमिक तपासात गॅस गळती अथवा स्फोटाचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपघातात टँकर व विजेच्या खांबाचे नुकसान झाले आहे. चालकाविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६०/२०२६ नोंद करण्यात आला असून मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल धायगुडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके