
अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिककार्य संचालनालयाच्या माध्यमातून विविध नाट्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. ज्यामध्ये संस्कृत नाट्यस्पर्धा, हिंदी नाट्यस्पर्धा, मराठी हौशी नाट्यस्पर्धा, मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धा, मराठी बाल नाट्यस्पर्धा इत्यादींचा समावेश असतो. यामधील काही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अशा स्वरुपात होतात तर काही स्पर्धा फक्त एकाच फेरीत होतात. जवळपास ६० वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून या स्पर्धा संपन्न होत आहेत. यावर्षी पहिल्यांदाच नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अमरावती मध्ये आयोजित होत आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बाल नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री. विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे.
अमरावतीचे प्रतिनिधी म्हणजे खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीतजी राणा, आमदार रवी राणा, आमदार प्रविण तायडे, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रतापदादा अडसड आदी मान्यवरांच्या विशेष प्रयत्नामधून ही स्पर्धा अमरावती येथे आयोजित होत आहे.मागील ५-६ वर्षांपासून अमरावती केंद्रावर बाल नाट्य स्पर्धांचा विक्रम नोंदविल्या जात असून मागील वर्षी अमरावती केंद्रावर सादर झालेल्या ६० एकांकिकाचा विक्रम या वर्षी अमरावती केंद्रानेच मोडला असून ८९ बाल नाट्यांच्या सहभागाचा नवीन विक्रम स्थापित झालेला आहे. स्पर्धा समन्वयक विशाल फाटे, अमरावती नाट्य परिषदेचे अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर डोरले, नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई चे नियामक मंडळ सदस्य प्रशांतजी देशपांडे, नाट्य परिषदेचे त्यांचे सहकारी या सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नांतून या स्पर्धा एका उच्च स्तरावर पोहोचलेल्या आहेत.
या वर्षी बाल नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी छत्रपती श्री. शिवाजी महाराज सभागृह, डॉ. पं.दे. मेडिकल कॉलेज परिसर येथे दि. २६/०२/२०२६ पासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेले उत्कृष्ट ४३ बालनाट्य सादर होणार असून १२०४ बाल कलावंत आणि तंत्रज्ञान अमरावती मध्ये आपली कला व कौशल्य सादर करणार आहेत. या स्पर्धेमधून उत्कृष्ट ठरलेल्या बाल नाट्यांना, कलावंतांना तसेच दिग्दर्शक इत्यादी तंत्रज्ञांना रोख पारितोषिक तसेच पदक आणि प्रशस्तीपत्र दिल्या जाणार आहेत.अमरावती जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे या स्पर्धेच्या आयोजनाकरिता सुरुवातीपासूनच सहकार्य मिळत असून त्यांचा प्रत्यक्ष सहभाग या आयोजनात असणार आहे.
अमरावतीकर कला रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि बाल कलावंतांना प्रोत्साहित करण्याकरिता संपूर्ण स्पर्धे दरम्यान उपस्थित राहावे असे आव्हान नाट्य परिषदेचे स्पर्धा समन्वयक विशाल फाटे, अमरावती नाट्य परिषदेचे अध्यक्ष, नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई चे नियामक मंडळ सदस्य, माजी महापौर तथा नाट्य परिषद उपाध्यक्ष आदी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी