महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक संस्कृती विचारशून्य झाली - दीपक पवार
छत्रपती संभाजीनगर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। ''महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक संस्कृती विचारशून्य झाली आहे. आजच्या विचारवंतांना, लेखकांना नव्याने विचार मांडता येत नाहीत. चौकटी मोडून सत्य बोलणारे लोक राहिले नाहीत,'' अशी खंत वक्ते डॉ. दीपक पवार यांन
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। 'महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक संस्कृती विचारशून्य झाली आहे. आजच्या विचारवंतांना, लेखकांना नव्याने विचार मांडता येत नाहीत. चौकटी मोडून सत्य बोलणारे लोक राहिले नाहीत,' अशी खंत वक्ते डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केली.

देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. पवार यांच्या हस्ते झाले. त्यांनी 'महाराष्ट्र धर्म : वर्तमान आणि भविष्य' या विषयावर पहिले पुष्प गुंफले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. रवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. दीपक पवार म्हणाले, 'सातवाहन काळापासून बदलता महाराष्ट्र कसा आहे याचा विचार करणे आवश्यक आहे.

समकालीन महाराष्ट्रात आपल्याला वैचारिक, नैतिक अधःपतन, कृतिशून्यता दिसून येते. त्यामुळे आपल्याला विचार करणे ही गोष्ट महत्त्वाची वाटत नाही. महाराष्ट्र धर्मामध्ये मराठी भाषा हा एक महत्वाचा पैलू आहे. परंतु मराठी माणसाने मराठी भाषेची चिकित्सा केली नाही. भाषेच्या, राज्याच्या प्रश्नांबाबत आपल्याला सत्ताधाऱ्यांना विचारता आले पाहिजे. दुर्दैवाने असे करताना कोणी दिसत नाही.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande