परभणी - पदोन्नतीसाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी; तिघेजण ताब्यात
परभणी, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। येथील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील पदोन्नती प्रकरणात २५ हजार रुपयांची लाचेच्या मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघा जणांना ताब्यात घेतले. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने या प्रकरणी
पदोन्नतीसाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची केली मागणी   -गृहरक्षक कार्यालयातील तिघेजण ताब्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


परभणी, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। येथील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील पदोन्नती प्रकरणात २५ हजार रुपयांची लाचेच्या मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघा जणांना ताब्यात घेतले.

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने या प्रकरणी २०फेब्रुवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना ३१ डिसेंबर २०२५ रोजी फलटणनायक पदाची पदोन्नती देण्यात आली होती. या पदोन्नतीबदल्यात बक्षीस म्हणून २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणात केंद्रनायक नानासाहेब गणपतराव मोखडे, प्रशासकीय अधिकारी माणिक शंकरराव वाडेकर आणि वरिष्ठ फलटण नायक ज्ञानोबा बाबुराव लटपटे यांनी संगनमताने रक्कम मागितल्याचे नमूद करण्यात आले. यापैकी ८ हजार रुपये तक्रारदाराकडून यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद होते. तक्रारीची पडताळणी २० फेब्रुवारी रोजी जिंतूर रस्त्यावरील जगदंबा हॉटेल येथे करण्यात आली. पडताळणीदरम्यान सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी ८ हजार रुपये स्विकारल्याचे मान्य करण्यात आले. उर्वरित रकमेबाबत तडजोड करून १२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली असून ती रक्कम वरिष्ठ फलटण नायक लटपटे यांच्याकडे देण्यास सांगण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पुढे २३ फेब्रुवारी रोजी जिंतूर रस्त्यावरील हॉटेल रायबा येथे सापळा रचण्यात आला. शासकीय पंचासमक्ष वरिष्ठ फलटण नायक ज्ञानोबा लटपटे यांनी तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच यावेळी स्विकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

अंगझडती दरम्यान नानासाहेब मोखडे यांच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल व २०० रुपये रोख रक्कम, माणिक वाडेकर यांच्याकडून रेडमी कंपनीचा मोबाईल व ४ हजार ५५५ रुपये रोख रक्कम, तर ज्ञानोबा लटपटे यांच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल व १०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. मोबाईल हँडसेटची तपासणी सुरू असून आवश्यकतेनुसार जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू आहे.

या प्रकरणी नानलपेठ पोलिसांत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्या नेतृत्वात व पोलिस उपाधिक्षक राहुल तरकसे यांच्या पर्यवेक्षणात करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande