
नंदुरबार, 24 फेब्रुवारी, (हिं.स.) शहादा शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गेल्या काही दिवसांत तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून अज्ञात चोरट्यांनी दोन मोटारसायकल आणि एक स्कुटी लंपास केली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुलवाडा (जि. तापी, गुजरात) येथील रहिवासी राजेशकुमार अशोकभाई पवार यांची ३० हजार रुपये किमतीची स्कुटी (क्र. जीजे-२७ एजे-२८५४) प्रकाशा बस स्थानकावरील मच्छी मार्केट जवळून चोरीला गेली.
याप्रकरणी पोलीस हवालदार मेहरसिंग वळवी तपास करीत आहेत. शहादा शहरातील डोंगरगाव रोडवरील ओम शांती नगर परिसरातून रोशन जामसिंग वळवी यांची ३० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा शाइन मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. फिर्यादी यांच्या घराच्या कंपाउंडमधून ११ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक अविनाश कोकणी करीत आहेत. चेतन अशोक पाटील (रा. हेरंभ नगर, शहादा) यांची ५० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची मोटारसायकल सौभाग्य मंगल कार्यालय परिसरातील कंपाउंडमधून चोरीला गेली. २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १:३० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार दीपक चौधरी करीत आहेत. या तिन्ही घटनांमधील साम्य म्हणजे चोरट्यांनी फिर्यादींच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने वाहने चोरून नेली आहेत. शहादा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे दाखल केले असून, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर