
नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला पाऊस तुरळक ठिकाणी व काही काळासाठीच झाला; मात्र त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळू लागला. काही भागांत तुरळक गारपीटही झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गहू, मका आणि चना उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल शेतातच वाळत घातला होता; तो पावसामुळे भिजून खराब झाला. तर काही शेतांमध्ये काढणीस आलेली पिके वादळी वाऱ्यामुळे आडवी पडली. परिणामी उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मोहपूर, मांडवी, बोधडी, किनवट, मांडवा, बेलोरी, पिंपळगाव आणि वंजारवाडी या भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, किनवट शहरातही पावसाचा जोर कायम राहिल्याने काही भागांत पाणी साचले. वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis