
बीड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी,गारा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन काढणीच्या टप्प्यावर आलेली गहू, हरभरा यासह अन्य रब्बी पिके भिजली. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून त्याचा थेट परिणाम शेतशिवारातील बहरलेल्या रब्बी पिकांवर दिसून येत आहे. गहू, ज्वारी, कांदा आणि हरभरा या पिकांवर किडी, अळी व विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पूस परिसरासह काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड शहर व परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे काढणीला आलेला गहू व हरभरा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आहे. मागील पाच वर्षांपासून फेब्रुवारी अखेर व मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीच्या घटना घडताना दिसत असून, याच काळात काढणीस आलेली पिके मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत.यंदा माजलगाव धरण भरलेले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात रब्बी हंगामाची पेरणी केली होती. गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा आणि कांदा या पिकांना प्राधान्य देण्यात आले असून धरणातील पाण्याचा लाभमिळत पहिल्या आवर्तनाचे पाणीही सोडण्यात आले
---------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis