
सोलापूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)माळशिरस तालुक्यातील सर्वच गावातील पाण्याची सध्याची स्थिती चांगली असून, तालुक्यातील एकूण ८४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, २१ गाव तलाव आणि ९९ पाझर तलावांमध्ये ३० ते ४० टक्के पाणीसाठा आहे. मार्चपर्यंत तरी पाणीटंचाई भासणार नसल्याची स्थिती आहे.गतवर्षी मार्चमध्येच चार गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यावर्षी मार्चनंतर डिसेंबरअखेर ५८ गावांतील ४४० वाड्या-वस्त्यांवर संभाव्य पाणी टंचाई भासणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता एस. एन. करवते यांनी दिली.
गतवर्षी तालुक्यात मार्चमध्ये गारवाड, मगरवाडी, सुळेवाडी, बचेरी या ४ गावांत तर एप्रिलमध्ये शिंगोर्णी, शिवारवस्ती, निटवेवाडी, पळस ६ तर मे महिन्यात मंडळ, भांब, फडतरी या सहा गावांमध्ये तर मे महिन्यानंतर लोंढे-मोहितेवाडी, कदमवाडी, लोणंद, जळभावी, पठाणवस्ती या सहा असे एकूण १६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे सध्या पाण्याची स्थिती चांगली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून काही गावांमध्ये टंचाई भासू शकते. यासाठी संभाव्य टंचाई आराखडा सादर करण्यात आला आहे. आजअखेर तरी कोणत्याही गावाचा प्रस्ताव आला नसल्याची माहिती करवते यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड