
रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : लांजा येथे ११ वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात रत्नागिरी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ११ जुलै २०२३ रोजी लांजा येथे घडली होती. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना आरोपी आशितोष अनिल जाधव (वय २०, रा. लांजा) याने मुलीसोबत असलेल्या दोन मुलांना धमकावून दूर पाठवले. त्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला व हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. घरी परतल्यानंतर मुलीची मानसिक अवस्था पाहून कुटुंबीयांनी विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. व्ही. देशमुख यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी आरोपीला जन्मठेप व २२ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. ---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी