
रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : डेरवण (ता. चिपळूण) येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकरक हॉस्पिटल निदान व संशोधन केंद्रामार्फत चालवण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कॅन्सर डिटेक्शन सेंटरला शासनाचे अधिकृत रेफरिंग सेंटर म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी आज विधानसभेत केली.
श्री. निकम यांच्या चिपळूण येथील कार्यालयामार्फत याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५-२६ दरम्यान चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी कोकणातील आरोग्य सुविधांबाबत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत ग्रामीण रुग्णांसाठी सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची ही आग्रही मागणी केली. डेरवणच्या रुग्णालयात कॅन्सरबाबत अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असून, शासनाकडून अधिकृत मान्यता मिळाल्यास कोकणातील ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना वेळेवर तपासणी व उपचाराचा मोठा लाभ होणार आहे.
कॅन्सरसारख्या गंभीर आजारात लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे असल्याने डेरवण येथील कॅन्सर डिटेक्शन सेंटरला अधिकृत मान्यता मिळणे दिलासादायक ठरणार असल्याचे आमदार निकम यांनी यावेळी नमूद केले.यापूर्वी जिल्ह्याला देण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी व्हॅन सध्या कार्यरत नाहीत, याकडेही लक्ष वेधत त्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात तसेच राज्यभर कॅन्सर तपासणी व्हॅनची संख्या वाढवावी, अशी मागणीही श्री. निकम यांनी केली.या मुद्द्यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. राज्यात कॅन्सर तपासणी व्हॅनची संख्या अपुरी असल्याचे मान्य करत, त्या वाढवण्याबाबत विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी