
अमरावती, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतीपयोगी असलेले साहित्य रात्रीच्या अंधारात चोरी करणाऱ्या टोळ्या तालुक्यात सक्रिय झाल्या आहेत. विहिरीवरील मोटार, झटका मशीन, वीजकेबल, स्प्रिंक्लर, असे साहित्य चोरीला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा तातडीने पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
नापिकी व अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच आता तालुक्यात शेतीसाहित्य चोरी करणाऱ्या भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनी साहित्य ठेवावे तरी कुठे? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. तालुक्यातील भारवाडी, अनकवाडी, शेंदूरजनाबाजारसह शहरालगत असलेल्या शेतातून रात्रीच्या काळोखात कृषी मोटार पंप, झटका मशीन, वीज केबल, स्प्रिंक्लर पाइप, असे साहित्य चोरी जात आहे. त्यामुळे या चोरट्यांना आवर घालून बेड्या ठोकाव्या, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटी व शेतकरी संघटनेकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी