
अमरावती, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। मनरेगा होळीनिमित्त राज्यातील मजुरांसाठी ६७ कोटींचा निधी मंजूर केला. यातील २८ कोटी ३९ लाखांचा निधी मेळघाटसाठी मंगळवारी उपलब्ध झाला आहे. हा निधी मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. होळीनिमित्त आदिवासींना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना मजुरी अदा करण्यासाठी ६७-कोटींचा निधी मंजूर केला.
याची देयके कोषागाराकडे सादर करण्यात आली. त्यानुसार आज मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. मेळघाट या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये मजुरांना काम देताना वाढीव लेबर बजेट मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे विचाराधीन असल्यामुळे काही कालावधीपासून मजुरी अदा करणे प्रलंबित होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मजुरांची मजुरी तातडीने जमा केली आहे. मजुरीचा निधी तातडीने मिळावा, यासाठी मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांनीही याबाबत पाठपुरावा केला आहे. केंद्र शासनाने १९ फेब्रुवारी रोजी राज्याच्या १३ कोटी मनुष्यदिवसांच्या लेबर बजेटमध्ये वाढ करून सुधारीत १६ कोटी मनुष्य दिवसांच्या बजेटला मान्यता दिली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजुरी वेळेत अदा केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी