
नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
नांदेड वाघाळा शहर
महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक ४५ जागेवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली आहे. महापालिकेत एकूण ८१ सदस्य संख्या आहे. भाजपाच्या वाट्याला ५ तर एमआयएम-१, काँग्रेस १, वंचित आघाडी- १ असे एकूण ८ स्वीकृत सदस्यांची संख्या निवडली जाणार आहे. भाजपाच्या वाट्याला ५ सदस्य संख्या येणार असून त्यासाठी ८० कार्यकर्त्यांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत.
महापालिकेत स्वीकृत सदस्य होण्यासाठी डॉक्टर, निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता, मुख्याध्यापक, सनदी लेखापाल, परिव्यय लेखापाल, अभियांत्रिकी पदवीधर, वकिल, न. प. चे मुख्याधिकारी किंवा महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त अशांना किमान पाच वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. तर सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तींनाच स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यास पात्र ठरणार आहेत.
अशोकराव चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून महापालिकेची सत्ता दिली आहे. खा. चव्हाणांनी देखील नांदेडच्या विकासाची गॅरंटी घेतली
आहे. महापालिकेत भाजपाचे ४५ संख्याबळ असल्याने ५ स्वीकृत सदस्य नियुक्त होणार आहेत. ८० कार्यकर्त्यांनी सभागृह नेते अॅड.
महेश कनकदंडे यांच्याकडे कागदपत्रासह अर्ज दाखल केला आहे. यात पक्षासाठी दिलेले योगदान आणि तिकिट नाकारल्यानंतरही पक्षासाठी केलेले काम याचा उल्लेख आहे. दरम्यान स्वीकृत सदस्य पदासाठी अॅड. दिलीप ठाकूर, दिलीप कंदकुर्ते अथवा त्यांचे चिरंजीव, चैतन्यबापू देशमुख, अमित तेहरा, महेंद्र पिंपळे, व्यंकटेश चाटे, भालचंद्र पवळे, महादेवी मठपती, मोहनसिंग तौर, शशिकांत सिरसाठ, विजय येवनकर, संदिप सोनकांबळे, संजय इंजेवाड, सुमती व्याहाळकर, संतोष जोशी, संतोष मानधने, व्यंकटेश जिंदम, अनिल हजारी आदीजण स्पर्धेत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis