अमरावती - बाबांच्या नागरवाडीत भक्ती, सेवा अन् समाजप्रबोधनाचा संगम
अमरावती, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। तालुक्यातील श्रीक्षेत्र नागरवाडी येथे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवात भक्ती, सेवा आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. सप्ताहभर भजन-कीर्तन, प्रवचन, हरिनाम सप्ताह,
बाबांच्या नागरवाडीत भक्ती, सेवा अन् समाजप्रबोधनाचा संगम


अमरावती, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। तालुक्यातील श्रीक्षेत्र नागरवाडी येथे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवात भक्ती, सेवा आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. सप्ताहभर भजन-कीर्तन, प्रवचन, हरिनाम सप्ताह, स्वच्छता अभियान, अन्नदान व वस्त्रदान अशा विविध सेवाभावी उपक्रमांतून हजारो भाविकांनी सहभाग घेत परिसर भक्तिमय केला. या सेवाभावी महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्यात रुग्णसेवक तथा श्री गाडगे महाराज धर्मशाळा दादरचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत देशमुख, संचालक कुणाल देशमुख, बापूसाहेब देशमुख यांनी सिंहासनस्थित श्री बाबांच्या मूर्तीचे पूजन व महाआरती करीत त्यांना अभिवादन केले.

या महोत्सवाच्या निमित्ताने सप्ताहभर काकड आरती, श्री बाबांची सामुदायिक प्रार्थना, भजन-कीर्तन-हरिनाम, प्रवचन, अन्नदान व वस्त्रदान, स्वच्छता अभियानासह शैक्षणिक आणि सेवाभावी कार्यक्रम पार पडले. समाप्ती सोहळ्याला वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या प्रतिमेची नागरवाडी इंद्रभुवनाच्या परिसरात भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो भविक भक्तांनी व दिंडी पथकांनी उत्स्फूर्तपणे सहभात घेत ‘गोपाला गोपाल देवकी नंदन गोपाला’च्या गगनभेदी निनादात नागरवाडी इंद्रभुवनाचा परिसर दुमदुमून गेला होता. तद्नंतर समाज प्रबोधनकार भरत महाराज रेळे यांचे संत गाडगेबाबांच्या जीवनचरित्रावर प्रवचन तसेच पडोळे महाराज यांनी काल्याचे कीर्तन करीत संत गाडगेबाबांच्या कार्याची महती विशद केली. संस्थेच्या वतीने संचालक कुणाल देशमुख यांनी पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.

संचालक बापूसाहेब देशमुख यांनी सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर तसेच दानशूर मंडळींचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी दिंडी पथकातील भाविकांना उबदार ब्लॅंकेट, चादर, टॉवेल, पुरुषांना शर्ट, महिलांना साड्या व गरजूंना भव्य वस्त्रदान करण्यात आले. तसेच हजारो भाविक भक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाला श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे अध्यक्ष मधुसूदन मोहिते, सचिव सचिन घोंगटे, खजीनदार ज्ञानदेव महाकाळ, व्यवस्थापक प्रशांत देशमुख, संचालक कुणाल देशमुख, व्यवस्थापक वसंतराव देशमुख, समाज प्रबोधनकार भरत महाराज रेळे, पडोळे महाराज, सुखदेव भुतडा, व्यवस्थापक प्रकाश महात्मे, गजानन जवंजाळ, मंगेश देशमुख, माजी मुख्याध्यापक किशोर चौधरी, दीपक देशमुख, प्रभाकर खोपे, सुखदेव नवघरे, कंत्राटदार सुधीर जाधव, अमोल शेळके, सुनील मोहोळ, रमेश तोटे आदींसह पंचक्रोशीतील भक्तमंडळी बहुसंख्येने या सोहळ्याला उपस्थित होती. यशस्वीतेकरिता संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात शाळेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व भक्तमंडळींनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande