
रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : कृत्रिम बुद्धिमत्ता आव्हान नसून संधी आहे. तरुणांनी त्यादृष्टीने त्याकडे पाहावे, असे प्रतिपादन केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक अध्यक्ष रवी पंडित केले.
फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, भारत हा तरुणांचा देश आहे. संधी या आपल्या पुढ्यात आव्हान म्हणून येत असतात. निसर्गात कुठलीही गोष्ट तीन घटकांपासून बनलेली असते, ऊर्जा, सामग्री आणि बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये संवेदना, समज व निर्णय या तीन घटकांचा समावेश होतो. आज नैसर्गिक बुद्धिमत्तेची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेत आहे; पण हे आव्हान नसून संधी आहे. आपण जर सृजनशील असू तर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपल्याला कोणताही धोका नाही. समीक्षात्मक विचारसरणी, चांगली अभिव्यक्ती व सर्जनशीलता ही तीन कौशल्ये असतील तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात आपण स्थिर राहू शकतो.
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी (उत्तर गोवा) वसंत दाभोळकर, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद उपस्थित होते. श्री. दाभोळकर म्हणाले, फिनोलेक्स कॉलेजमधील निकोप शैक्षणिक वातावरणाचा मला माझ्या भविष्यातील प्रगतीसाठी खूप फायदा झाला. येथे बरीच कौशल्ये शिकावयास मिळाली. विद्यार्थ्यांनीही आपले भविष्य उज्ज्वल व समृद्ध बनवण्यासाठी कॉलेज जीवनामध्ये निरनिराळी कौशल्ये आत्मसात करावीत.
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा, भारतीय ज्ञानाचा समृद्ध वारसा, त्याचा वैज्ञानिक पाया, त्याची आधुनिक काळातील गरज या सर्वांचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे या दृष्टीने 'भारतस्य राजपरंपरा : इतिहासस्य स्वर्णयुगम्' ही एक आगळीवेगळी स्पर्धा व प्रदर्शन घेण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी