
रायगड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दिले.
दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित पूर्वतयारी बैठकीत त्यांनी विविध यंत्रणांचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीत कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पायाभूत सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता आणि आपत्कालीन यंत्रणा आदींबाबतची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. कार्यक्रमस्थळी खारघर, नवी मुंबई येथील ओवे मैदानावर सुमारे 5 लाख भाविकांची क्षमता असून मुख्य मंडपात 80 हजार भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष मार्गयोजना आखण्यात आली असून 30 पार्किंग स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून कडक बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सायबर पोलीस व एटीएसची मदतही घेण्यात येणार आहे.
आरोग्य सुविधांसाठी 5 तात्पुरती वैद्यकीय केंद्रे व एक आयसीयू उभारण्यात येणार असून जवळील रुग्णालयांमध्ये 350 खाटा व 75 आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. लंगर व्यवस्थेसाठी 1 हजार गॅस सिलेंडर तसेच पाणीपुरवठा, वीज व स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘हिंद दी चादर’ या गीताच्या समूहगानातून 51 लाख विद्यार्थी व 1.5 लाख शिक्षण कर्मचाऱ्यांच्या सहभागाची ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती देण्यात आली. प्रधान सचिवांनी या उपक्रमाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके