
लातूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष
अहमदपूर येथील 'क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूल'मध्ये ३०-३२ विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने लातूर जिल्हा हादरला असतानाच, आता या प्रकरणाच्या तपासाला मोठी गती मिळाली आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपी शिक्षक उज्वल सोनी याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाचा कडक पवित्रा
अहमदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. केवळ गुन्हा दाखल करून थांबणार नाही, तर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या प्रवृत्तीचा पर्दाफाश केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि शाळेतील एकूणच शिस्तीच्या नावाखाली चालणारे प्रकार यांची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तपास अधिकारी स्मिता जाधव यांची माहिती
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव यांनी सांगितले की, आरोपी उज्वल सोनी याला अटक केल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर तरतुदींनुसार प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे प्राधान्य आहे. जखमी विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर आता तांत्रिक पुराव्यांची जमावाजमव सुरू आहे.
शिक्षण विभागाची चौकशी आणि पुढील निर्णय
या प्रकरणाची शिक्षण विभागानेही अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. लातूर जिल्हा उपशिक्षणाधिकारी शिरसागर यांनी सदरील शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर चौकशी केली आहे. या चौकशीचा अहवाल तयार करण्यात आला असून, या शाळेवर पुढील निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा शिक्षणाधिकारी मठपती यांना आहेत.
शिक्षणाच्या पंढरीत अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. पालकांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करावे. आम्ही या प्रकरणाची अत्यंत बारकाईने आणि सखोल चौकशी करत आहोत.
— विनोद मेत्रेवार, पोलीस निरीक्षक, अहमदपूर.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis