
अकोला, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत महाराष्ट्र राज्य शासन यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे अकोला जिल्ह्यातील सरपंचांनी स्वागत करत शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर प्रशासक नियुक्ती प्रक्रियेत येणारी अनिश्चितता आणि दिरंगाई यामुळे गावपातळीवरील कामकाजावर परिणाम होत असल्याची बाब सरपंचांनी वारंवार मांडली होती.
याबाबत अकोला जिल्ह्याच्या वतीने 15 फेब्रुवारी रोजी विद्य. न्यायालयात याचिका दाखल केली होती तर दुसरी. याचिका बुलडाणा जिल्ह्यातील अरुण दळवी यांनी दाखल केली होती. या याचिकावर विद्य न्यायालयाने 22 फेब्रुवारी रोजी निर्णय दिला आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर विकासकामे, निधी वितरण, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रशासकाची वेळेत नियुक्ती होणे अत्यावश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी प्रशासक नियुक्ती प्रक्रियेत विलंब होत असल्याने निर्णय प्रलंबित राहत होते. परिणामी नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले होते.
याचिकेद्वारे शासनाचे लक्ष वेधले या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा येथील सरपंचांनी एकत्र येत शासनाकडे याचिका सादर केली होती. प्रशासक नियुक्ती प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज खंडित होऊ नये आणि गावांच्या विकासाला खीळ बसू नये, या उद्देशाने हा पाठपुरावा करण्यात आला होता.सरपंचांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेत निर्णय जाहीर केल्याचे सांगण्यात आले. मात्र इतक्या महत्त्वाच्या विषयाला अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नसल्याची खंत सरपंचांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणीची मागणी!
दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून काही ठिकाणी अजूनही प्रशासक नियुक्तीत दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाची तातडीने आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी, अशी मागणी अकोला जिल्ह्यातील सरपंचांनी केली आहे. गावपातळीवरील प्रशासन सक्षम, उत्तरदायी आणि विकासाभिमुख राहण्यासाठी शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या पत्रकार परिषदेला महान ग्रामपंचायतचे सरपंच सुनील ढा. कोलकर, हिंगणी बु. येथील सरपंच डॉ. कल्पना अशोक पळस पगार, खिरपूरीचे यशवंत दांदळे, खेर्डा बु. येथील सौ. विद्या ओम महल्ले, मोरगाव भाकरे येथील सौ. उमा ज्ञा. माळी आदी सरपंच उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे