ट्रकची दुचाकीला धडक, मजूर ठार
जळगाव, 25 फेब्रुवारी (हिं.स.) छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मजुरांच्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एक मजूर जागीच ठार झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वरील साई हॉटेलसमोर
ट्रकची दुचाकीला धडक, मजूर ठार


जळगाव, 25 फेब्रुवारी (हिं.स.) छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मजुरांच्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एक मजूर जागीच ठार झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वरील साई हॉटेलसमोर घडला. शेतातून मका कापणीचा सौदा करून घरी परतत असताना ईश्वर भानुदास सोनवणे (वय ४५) व शाम यादव चौधरी (वय ३०) यांच्या दुचाकीला (क्रमांक एमएच १९ डीबी २९५०) मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच २० सीटी ८०५३) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी चेंडूप्रमाणे सुमारे ७ ते १० फूट उंच उडाली. या अपघातात मागे बसलेले ईश्वर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक शाम चौधरी गंभीर जखमी झाले. समोरून येणाऱ्या आणखी एका दुचाकीस्वारालाही ट्रकची धडक बसली; मात्र प्रसंगावधान राखून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. महामार्गावरील सद्दाम शेख व सचिन पाटील यांनी तात्काळ जखमींना आपल्या दुचाकीवरून सरकारी दवाखान्यात हलवले. दरम्यान, पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला इमरान भाई या ऑटोचालकाने पाठलाग करून मेट्रो वाईन शॉपजवळ पकडले. मद्यप्राशन करून ट्रक चालविणाऱ्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मयताचे भाऊ ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक दिलीप प्रभाकर राखटे (करंजखेडा, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande