छत्रपती संभाजीनगर-७० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ विशेष मोहीम
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.) - आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ७० वर्षे व त्यावरील नागरिकांचे “आयुष्मान वय वंदना कार्ड” निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागात गावनिहाय व शहरी भागात वॉर्डनिहाय विशेष मोहीम राबविण्यात येणार आ
छत्रपती संभाजीनगर-७० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ विशेष मोहीम


छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.) - आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ७० वर्षे व त्यावरील नागरिकांचे “आयुष्मान वय वंदना कार्ड” निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागात गावनिहाय व शहरी भागात वॉर्डनिहाय विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला.

सध्या जिल्ह्यात ७० वर्षे व त्यावरील ९७ हजार ७४१ लाभार्थी पात्र असून त्यापैकी १४,८३८ (१५ टक्के) लाभार्थ्यांचे आयुष्मान वय वंदना कार्ड ई-केवायसी पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी आशा कर्मचारी,स्वस्त धान्य दुकान चालक तसेच आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रती यशस्वी ई-केवायसीसाठी २० रुपये व आयुष्मान कार्ड वितरणासाठी १० रुपये असे एकूण ३० रुपये मानधन देण्याबाबत शासन निर्णय पारित करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत उपचाराचा लाभ मिळतो. तसेच ७० वर्षे व त्यावरील “आयुष्मान वय वंदना कार्ड” धारकांना प्रति लाभार्थी प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत २३९९ आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया व उपचार सुविधा उपलब्ध आहे.

ही सुविधा जिल्ह्यातील २७ खाजगी व १३ शासकीय अशा एकूण ४० रुग्णालयांमध्ये तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहे.जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र,CSC केंद्र,रेशन दुकानदार, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड मोफत काढून देण्यात येणार आहे.७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी “आयुष्मान वय वंदना कार्ड” काढून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे. विशेष मोहीम १३ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.संबंधित कर्मचारी गाव,वॉर्ड,वाडी,वस्ती, शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन आयुष्मान कार्डचे ई-केवायसी करणार आहेत.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande