
परभणी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनास भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी भेट देत शेतकरी व संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्या सविस्तरपणे जाणून घेतल्या. जिल्ह्यात सुरू असलेली सामूहिक मोजणी तत्काळ थांबवून झालेल्या मोजण्या रद्द कराव्यात, मोजणीदरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत तसेच प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, या प्रमुख मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.श्री. भरोसे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत या प्रश्नांवर शासन स्तरावर सकारात्मक तोडगा निघण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ती भूमिका घेण्यात येईल तसेच त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी आंदोलनकर्ते शांतीभूषण कच्छवे, कृष्णा बल्लाळ, धोंडीराम बल्लाळ, ज्ञानेश्वर बल्लाळ, माधव चांगभले, संतोष इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis