
चंद्रपूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिकेच्या पीएम श्री सावित्रीबाई फुले शाळेतील ३३ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ( एनएमएमएस ) परीक्षेत उत्तीर्ण झाले असुन शहरातील एका शाळेतील सर्वात अधिक संख्येने या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मनपा शाळेने मिळविला आहे.
जातीनिहाय आरक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या अनेक कल्याणकारी शिष्यवृत्ती योजनांचा दरवर्षी लाभ मिळत असतो. परंतु ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशपातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रक्षेची जोपासना, तसेच त्यांचे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस ) परीक्षा ही इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (वार्षिक उत्पन्न ३.५ लाखांपेक्षा कमी) आणि सरकारी/अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना ९ वी ते १२वी पर्यंत प्रतिवर्षी १२,००० रुपये शिष्यवृत्ती मिळते.
या उल्लेखनीय यशामागे शाळेचे मुख्याध्यापक शिवलाल इरपाते, विषय शिक्षक जोगेश्वर मोहारे,सोनाली कासुलकर तसेच वर्गशिक्षक मंगेश अंबादे यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन, परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न मोलाचे ठरले आहेत. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे समर्पण आणि पालकांचा पाठिंबा या त्रिसूत्रीमुळेच हे यश शक्य झाले आहे. शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा पाठिंबा यामुळे हे यश मिळाले असून, भविष्यात अशा परीक्षांमध्ये अधिक विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी आवश्यक सुविधा व मार्गदर्शन अधिक चांगल्यारितीने मिळेल याकडे लक्ष दिल्या जाईल अशी ग्वाही आयुक्त अकुनुरी नरेश यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव