
पालघर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यातून क्लोरीन वायूची गळती सुरू झाल्याने काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, गळती सुरू होताच कारखान्यातील सर्व कर्मचारी व कामगारांना तत्काळ बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
तारापूर औद्योगिक क्षेत्र येथील प्लॉट क्रमांक डब्ल्यू-८२/ए वरील श्री विनायक केमेक्स या रासायनिक कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया विभागात बुधवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक क्लोरीन वायूची गळती सुरू झाली. वायूगळतीमुळे कारखान्यातील कर्मचारी व कामगारांना तीव्र दुर्गंधीचा त्रास जाणवू लागल्याने सर्वांना तातडीने सुरक्षितपणे कारखाना परिसराच्या बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दल व बोईसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वायूगळतीवर नियंत्रण मिळवले. क्लोरीन वायू हवेमध्ये पसरल्याने आजूबाजूच्या कारखान्यांमधील कामगार तसेच परिसरातील नागरिकांना काही काळ दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कारखाना परिसरात प्रवेशबंदी लागू केली आहे.
दरम्यान, आशिया खंडातील मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रात वाढत्या अपघाती घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या पाच वर्षांत येथे ९१ औद्योगिक अपघातांची नोंद झाली असून, त्यात ४८ कामगारांचा मृत्यू तर ९० कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
प्रमुख अपघातांची नोंद :
मेडली फार्मास्युटिकल्स (ऑगस्ट २०२५) : ४ कामगारांचा मृत्यू, २ गंभीर जखमी
तारा नायट्रेट कंपनी (जानेवारी २०२०) : ७ कामगारांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी
रिस्पॉन्सिव्ह कंपनी (३१ ऑक्टोबर २०२५) : यंत्रबिघाडातून लागलेल्या आगीत ३ कामगार गंभीर भाजले; उपचारादरम्यान २ जणांचा मृत्यू
औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL