
बीड, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन बीड विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर सविस्तर निवेदन सादर केले.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ एफ खरवंडी ते नवगण राजुरी या रस्त्याचे विस्तारीकरण, मजबुतीकरण तसेच आवश्यक त्या ठिकाणी भूसंपादन करण्याचे काम सन २०१८ मध्येच मंजूर झाले आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने अंदाजपत्रकानुसार काम न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून रस्ता अर्धवट अवस्थेत सोडला आहे.
या अनियमिततेमुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, पादचाऱ्यांना व ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे
याहूनही गंभीर बाब म्हणजे, या रस्त्यासाठी ज्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना आजपर्यंत योग्य मोबदला (मावेजा) मिळालेला नाही. अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मंत्री महोदयांना विनंती केली की, आपण या प्रकरणात स्वतः लक्ष घालून निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच प्रलंबित मावेजा तातडीने अदा करावा, रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करावे.
भ
जनतेच्या सुरक्षिततेचा आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रश्न हा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. नागरिकांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis