पालघर - चिंचघर ग्रामपंचायतीचा प्लास्टिकमुक्त गावाचा निर्धार
पालघर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ हे ब्रीद समोर ठेवत पालघर जिल्ह्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या वतीने संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून प्लास्टिक व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्
चिंचघर ग्रामपंचायतीचा प्लास्टिकमुक्त गावाचा निर्धार; स्वच्छता संदेश रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


पालघर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ हे ब्रीद समोर ठेवत पालघर जिल्ह्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या वतीने संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून प्लास्टिक व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, संपूर्ण गाव स्वच्छता दूतांच्या घोषणांनी दुमदुमून गेले.

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली १९ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी चिंचघर ग्रामपंचायतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या स्वच्छता संदेश रॅलीने झाली. ‘प्लास्टिकला नकार, स्वच्छतेचा स्वीकार’, ‘प्लास्टिकमुक्त चिंचघर’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नूतन कचरा विलगीकरण शेडचे उद्घाटन करण्यात आले. ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्लास्टिकमुक्त गाव साकारण्यासाठी स्थानिक दुकानदार व व्यावसायिकांनी ग्राहकांना कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान आणि त्याचे दुष्परिणाम याबाबतही जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमामुळे चिंचघर ग्रामपंचायतीचा प्लास्टिकमुक्तीचा निर्धार अधिक ठोस झाला असून, गाव स्वच्छ व पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande