लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबेंची ट्युशन एरियात भेट
लातूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.) जिल्हा पोलीस अधीक्षकअमोल तांबे यांची ट्युशन एरिया भेटीदरम्यान वेणूताई गर्ल्स हॉस्टेलला भेट दिली. ट्युशन परिसरातील अडचणी जाणून घेत दिले तात्काळ उपाययोजनेचे आदेश. लातूर शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत लातूर जिल्
पोलीस अधिक्षक अमोल तांबे


लातूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.) जिल्हा पोलीस अधीक्षकअमोल तांबे यांची ट्युशन एरिया भेटीदरम्यान वेणूताई गर्ल्स हॉस्टेलला भेट दिली. ट्युशन परिसरातील अडचणी जाणून घेत दिले तात्काळ उपाययोजनेचे आदेश. लातूर शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी ट्युशन एरिया भेटी दरम्यान आज वेणूताई गर्ल्स हॉस्टेल येथे सदिच्छा भेट देत विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. विद्यार्थिनींच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले.

लातूर शहर हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असून राज्याच्या विविध भागांतून तसेच बाहेरगावाहून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी येत असतात. शिक्षणासोबतच सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असल्याची जाणीव ठेवून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी ट्युशन एरिया भेटीदरम्यान वेणूताई गर्ल्स हॉस्टेल येथे थेट भेट देत तेथील विद्यार्थिनींशी संवाद साधला.

या भेटीदरम्यान विद्यार्थिनींनी ट्युशन क्लासला जाताना व परतताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. काही ठिकाणी अंधार, वाहतुकीची अडचण, संशयास्पद व्यक्तींची उपस्थिती किंवा सुरक्षिततेबाबत निर्माण होणारी चिंता यासंदर्भात विद्यार्थिनींनी आपली मते व्यक्त केली. पोलीस अधीक्षकांनी सर्व बाबी अत्यंत लक्षपूर्वक ऐकून आणि समजून घेतल्या.यावेळी त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना ट्युशन परिसरात नियमित गस्त वाढविणे, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवणे, विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे याबाबत सूचना दिल्या. तसेच कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास तात्काळ पोलीसांना कळविण्याचे आवाहन विद्यार्थिनींना करण्यात आले.

संवादादरम्यान पोलीस अधीक्षकांनी विद्यार्थिनींशी दिलखुलास चर्चा करत त्यांना त्यांचे उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारच्या भीती किंवा दबावाखाली न राहता आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे, पोलीस प्रशासन कायम तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

ट्युशन परिसर भेटीदरम्यान वेणूताई गर्ल्स हॉस्टेल येथे झालेल्या या भेटीमुळे विद्यार्थिनींमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाल्याचे पाहावयास मिळाले. अनेक विद्यार्थिनींनी पोलीस अधीक्षकांनी स्वतः हॉस्टेलमध्ये येऊन संवाद साधल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

लातूर जिल्हा पोलीस दल हे महिला सुरक्षा व विद्यार्थ्यांच्या हितासाठी सतत तत्पर असून भविष्यातही अशा प्रकारचे लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande