पाणीपट्टी भरूनही कोरडे नळ; मानकुळेतील (ता. अलिबाग) ग्रामस्थ संतप्त
रायगड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा, मानकुळे, नारंगी, टेप बंगला बंदर आदी गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सुमारे पावणेचार हजार लोकसंख्या असलेल्या या गावांतील नागरिकांना दररोज पाण्यासाठी ह
Dry tap despite paying water bill; Villagers in Mankule angry


रायगड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा, मानकुळे, नारंगी, टेप बंगला बंदर आदी गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सुमारे पावणेचार हजार लोकसंख्या असलेल्या या गावांतील नागरिकांना दररोज पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

बांधबंदिस्तीच्या अभावामुळे समुद्राच्या उधाणाचे खारे पाणी गावाच्या वेशीपर्यंत पोहोचत असल्याने विहिरी व पाणीस्रोत खारट झाले आहेत. त्यामुळे गोड्या पाण्याविना नागरिकांना पर्याय उरलेला नाही. जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात असला तरी जानेवारी व फेब्रुवारी 2026 या कालावधीत तांत्रिक कारणांमुळे दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा वारंवार खंडित झाला. परिणामी नागरिकांना खाजगी टँकरमधून महागड्या दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर याचा मोठा ताण पडत आहे.

दरम्यान, राज्य शासनाने पाणीपट्टी भरण्यासाठी 50 टक्के सवलत दिल्यानंतर येथील नागरिकांनी नियमितपणे पाणीपट्टी भरून शासनाच्या महसुलात भर घातली आहे. मात्र पाणीपट्टी भरूनही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा पाणीपुरवठा अधिकारी, एमआयडीसीचे उच्चस्तरीय अधिकारी, तहसीलदार अलिबाग, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, तसेच संबंधित सर्व शासकीय विभागांनी तातडीने संयुक्त पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी ठाम मागणी येथील जनतेकडून करण्यात येत आहे.

“मुबलक आणि शुद्ध पिण्याचे पाणी हा आमचा हक्क आहे. तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी योजना राबवून आमचा पाणीप्रश्न सोडवावा,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande