महावितरणच्या रत्नागिरी परिमंडलात 25 कोटी 91 लाखांची वीजबिल थकबाकी
रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 1 लाख 67 हजार 825 ग्राहकांकडे 2
महावितरणच्या रत्नागिरी परिमंडलात 25 कोटी 91 लाखांची वीजबिल थकबाकी


रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 1 लाख 67 हजार 825 ग्राहकांकडे 25 कोटी 91 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. वीज बिल थकबाकीमुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडल अंतर्गत 1 हजार 182 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे.

रत्नागिरी परिमंडल अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती 1 लाख 46 हजार 277 ग्राहकांकडे 14 कोटी 51 लाख, व्यावसायिक 14 हजार 400 ग्राहकांकडे 5 कोटी 25 लाख, औद्योगिक 1 हजार 639 ग्राहकांकडे 3 कोटी 28 लाख, सार्वजनिक सेवा 5 हजार 150 ग्राहकांकडे 2 कोटी 60 लाख आणि इतर वर्गवारीतील 359 ग्राहकांकडे 27 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

रत्नागिरी विभागात 43 हजार 843 ग्राहकांकडे 05 कोटी 84 लाख, चिपळूण विभागात 24 हजार 648 ग्राहकांकडे 3 कोटी 31 लाख, खेड विभागात 26 हजार 375 ग्राहकांकडे 03 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 708 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात 34 हजार 851 ग्राहकांकडे 6 कोटी 12 लाख, कुडाळ विभागात 38 हजार 108 ग्राहकांकडे 7 कोटी 4 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 474 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे.

थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च 2026 अखेरपर्यंत शनिवारी, रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. ग्राहकांना देय रकमेवर 0.25 टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. याव्यतिरिक्त महावितरणने 5 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande