
रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून करण्यात येणारी कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत. दिलेली मुदत पाळली गेली पाहिजे. अन्यथा संबंधित विभाग प्रमुखाची चौकशी केली जाईल. कामाच्या दर्जाबाबतही चौकशी केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला.
जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेबाबत आज जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी सादरीकरण करून विभागनिहाय माहिती दिली.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी विभागनिहाय आढावा घेतला. झालेली कामे, आलेली मागणी, दायित्व याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. ते म्हणाले, दायित्वाची मागणी करावी. ५ मार्चपर्यंत मागणी न आल्यास चौकशी केली जाईल. प्रशासकीय मान्यता घेताना घातलेल्या अटी, शर्तींप्रमाणे पाहिले जाईल. करदात्यांचा हा पैसा आहे, तो व्यवस्थित दर्जात्मक कामांसाठी वापरला गेला पाहिजे, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. बाह्य संस्थेमार्फत दर्जाबाबतदेखील तपासणी केली जाईल.
येत्या १५ मार्चपर्यंत खर्च करावा, ज्याच्यासाठी निधी दिला जातो, ते कामदेखील वेळेवर पूर्ण झाले पाहिजे, सर्वजण १०० टक्के निधी खर्च करणार अशी मला खात्री आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी