नाशिककरीता प्रादेशिक नावीन्यता केंद्राचा प्रस्ताव
नाशिक, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीतर्फे (MSInS) नाशिककरीता प्रादेशिक नावीण्यता केंद्राचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
नाशिककरीता प्रादेशिक नावीन्यता केंद्राचा प्रस्ताव


नाशिक, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीतर्फे (MSInS) नाशिककरीता प्रादेशिक नावीण्यता केंद्राचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

सोसायटीतर्फे ताज गेटवे, नाशिक येथे आयोजित गोदावरी इन्व्हेस्टमेन्ट अॅण्ड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्हचे उद्घाटन झाले. या परिषदेत वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, गुंतवणूकदार, स्टार्टअप्स आणि परिसंस्था उभारणी करणाऱ्या संस्थांचा सहभाग होता. शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.

उद्घाटन सत्रात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय, सीएसआर बॉक्सचे (CSRBOX) संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भोमिक शाह, Diageo in Society चे ग्लोबल डायरेक्टर जेम्स अॅशल उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील समन्वयातून तुकड्या- तुकड्यांच्या उपक्रमांऐवजी प्रणालीगत व नावीण्यता-आधारित परिणाम साध्य करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

डॉ. पाटील म्हणाले की, गोदावरी इन्व्हेस्टमेन्ट अॅण्ड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह तसेच प्रादेशिक स्टार्टअप संवादाच्या माध्यमातून नाशिकला नाविन्यता-आधारित शाश्वत विकासाचे प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे.

जिल्हास्तरावर नावीण्यता परिसंस्था मजबूत करण्याचा राज्याचा आराखडा मांडला आणि नाशिकला स्वतंत्र प्रादेशिक नावीण्यता केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्र स्टार्टअप धोरणांतर्गत नावीण्यात सोसायटी कल्पनेपासून विस्तारापर्यंत स्टार्टअप्सना मार्गदर्शन, संस्थात्मक भागीदारी, भांडवल उपलब्धता आणि शासकीय समन्वयाद्वारे एकात्मिक सहाय्य प्रणाली उभारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी रेअर अर्थ मेटल्स आणि महत्त्वपूर्ण खनिज मूल्यसाखळी यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्सनी संशोधन व नावीण्यता-आधारित उपाय विकसित करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी, नवउद्योजक आणि प्रारंभीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना सक्षम करण्यासाठी तळागाळात मायक्रो-इन्क्युबेटर्स स्थापन करण्याचा मानस आहे. या विकेंद्रित दृष्टिकोनातून महानगरांबाहेरील स्थानिक प्रतिभेला चालना मिळेल आणि प्रादेशिक समस्यांवर स्थानिक उपाय निर्माण होतील.

नाशिकमधील ३० हून अधिक उद्योग प्रतिनिधींशी झालेल्या गोलमेज परिषदेत आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाश्वत पायाभूत सुविधा, हवामान बदल अनुकूलन, पाणी व कचरा व्यवस्थापन तसेच तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक प्रणालीवर चर्चा झाली. CSR आणि नाविन्यता-आधारित हस्तक्षेपांच्या माध्यमातून कुंभला जागतिक स्तरावरील “लिव्हिंग लॅब” म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली.

डॉ. पाटील यांच्या हस्ते सस्टेनेबिलिटी इनोव्हेशन लॅब अंतर्गत निवडलेल्या स्टार्टअप्सना पारितोषिक वितरण करण्यात आले. नाविन्यता-आधारित आणि प्रभावाभिमुख उद्योजकतेला चालना देण्याची नाविन्यता सोसायटी बांधिलकी त्यांनी पुनः अधोरेखित केली.

यावेळी आयोजित प्रादेशिक स्टार्टअप व नाविन्यता संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. पाटील यांनी स्टार्टअप्स, इन्क्युबेटर्स, गुंतवणूकदार आणि परिसंस्था सक्षमीकरण करणाऱ्या संस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रादेशिक स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्याची दृष्टी मांडली. ग्रामीण भागातील नाविन्यता, इन्क्युबेशन नेटवर्क आणि परिणामाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळात प्रभाव निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी राबवत असलेल्या धोरणात्मक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande