
लातूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सातत्याने प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी धाडसी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला त्यांच्या हद्दीत अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी पथकाला संशयित वाहनाचा शोध घेऊन आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस पथकाने परिसरात नमूद वाहनांचा शोध मोहीम सुरू केली. दरम्यान नाईक चौक परिसरात संशयित वाहन दिसून आल्यानंतर पोलिसांनी ते अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहन थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला आणि अखेर नागलगाव परिसरात सदर वाहन अडवून पकडण्यात यश मिळवले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये
१) आखीब मुसाभाई मिर्झा (वय 27 वर्ष, रा. मदिना नगर, उदगीर) हा इसम आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थ असलेला “विमल” नावाचा गुटखा वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत सदर माल
२) फिरोज पटवेकर (रा. नळेगाव) यांच्याकडे देण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती आरोपीने दिली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे ₹2,80,800/- किंमतीचा प्रतिबंधित गुटखा,
टोयोटा कंपनीची इटिऑस चारचाकी (MH 12 HL 9780) अंदाजे किंमत ₹7,50,000/- असा एकूण ₹10,30,800/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक 93/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायपाल्ले हे करीत असून या अवैध गुटखा पुरवठा साखळीतील इतर संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून अवैध धंदे, प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक व सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis