कर्जत–२ निबंधक कार्यालय आता नेरळमध्ये; प्रशासनाचे आवाहन
रायगड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। कर्जत–२ (ररायगड) येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे नेरळ येथील पायरमाळ परिसरात स्थलांतर करण्यात आले असून नागरिकांनी नव्या पत्त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनिक अधिकारी विक्रांत जी.
Karjat-2 Registrar's Office now in Neral; Administration appeals


Karjat-2 Registrar's Office now in Neral; Administration appeals


रायगड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। कर्जत–२ (ररायगड) येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे नेरळ येथील पायरमाळ परिसरात स्थलांतर करण्यात आले असून नागरिकांनी नव्या पत्त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनिक अधिकारी विक्रांत जी. आंबरस्कर, जन माहिती अधिकारी तथा सह दुय्यम निबंधक यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.

सदर कार्यालय आता नेरळ येथील पायरमाळ परिसरात, साई शोभा सोसायटी, तन्वी हॉटेलच्या मागील बाजूस कार्यरत झाले आहे. शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी कार्यालय सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी कार्यालय जुन्या पत्त्यावर कार्यरत होते; मात्र वाढती कामाची व्याप्ती आणि नागरिकांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला.

मालमत्ता दस्त नोंदणी, खरेदी-विक्री करार नोंदणी, गहाणखत नोंदणी, विवाह नोंदणी तसेच इतर शासकीय कागदपत्रांची पडताळणी आदी महत्त्वाची कामे या कार्यालयामार्फत केली जातात. दररोज मोठ्या संख्येने नागरिक, वकील आणि दस्त लेखक विविध कामांसाठी येथे येत असतात. त्यामुळे कार्यालयाचे ठिकाण बदलल्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

नवीन कार्यालयात आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून सर्व सेवा नियमितपणे सुरू आहेत. माहिती अधिकाराशी संबंधित कामकाजही पूर्ववत सुरू राहणार आहे. जुन्या पत्त्यावर येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तरी परिसरातील नागरिक, वकील व संबंधितांनी कोणत्याही शासकीय कामासाठी थेट नेरळ पायरमाळ येथील नव्या पत्त्यावरच संपर्क साधावा, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाने केले आहे.

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande