नांदेड - भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कौडगे, देशमुख यांची निवड
नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत नांदेड जिल्ह्याला एकाच वेळी दोन प्रदेश उपाध्यक्षपदे मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी या निर्णयाच्या राजकीय अर्थाबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे
नांदेड - भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कौडगे, देशमुख यांची निवड


नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत नांदेड जिल्ह्याला एकाच वेळी दोन प्रदेश उपाध्यक्षपदे मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी या निर्णयाच्या राजकीय अर्थाबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे. चैतन्यबापू देशमुख आणि संजय कौडगे या दोघांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर होताच अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला; मात्र मराठवाड्याला प्रदेश सरचिटणीसपद न मिळाल्याने असंतोषाची कुजबुजही ऐकू येत आहे. महानगरपालिका निवडणुकीत तिकीट वाटपावेळी डावलले गेलेले चैतन्यबापू देशमुख यांची प्रदेश स्तरावर वर्णी लागणार, असे संकेत तेव्हाच मिळाले होते. संघ परिवाराशी निष्ठा आणि भाजपासाठी मागील तीन तपांपासून केलेले एकनिष्ठ काम याची दखल घेत पक्षाने त्यांना उपाध्यक्षपद बहाल केल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे 'राजकीय समतोल' साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे, मराठवाड्याचे संघटन मंत्री म्हणून कार्यरत संजय कौडगे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले.

संघटन मंत्री हे पक्ष संघटनेतील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी पद मानले जाते. अशा स्थितीत कौडगे यांना संघटनातून दूर करून उपाध्यक्षपदी नेमण्यात आल्याने या बदलामागील राजकीय गणितांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, कौडगे हे प्रदेश सरचिटणीसपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती; मात्र मराठवाड्यातून या पदावर कोणालाही संधी देण्यात आलेली नाही. प्रदेश उपाध्यक्षपदी लातूरच्या अर्चना चाकूरकर यांचीही निवड झाली असून, छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी परिषदेचे माजी कार्यकर्ते प्रवीण घुगे यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला प्रदेश सरचिटणीसपद देताना झुकते माप मिळाल्याची भावना मराठवाड्यातून व्यक्त होत आहे.

परिणामी, 'दोन उपाध्यक्ष' हा सन्मान की 'सरचिटणीसपदाचा अभाव' ही उपेक्षा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पूर्वी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनाही उपाध्यक्षपद देण्यात आले होते; मात्र राज्यस्तरीय राजकारणात डावलले गेल्याची भावना निर्माण झाल्यानंतर त्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला होता.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande