महा ई सेवा व आधार केंद्र चालकांचे ९ मार्च रोजी मुंबईत धरणे आंदोलन
परभणी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्यातील महा ई सेवा व आधार सेवा केंद्र चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल महासंघ महा ई सेवा व आधार केंद्र यांच्या वतीने सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे राज्यव्यापी कामबंद धरणे आंद
महा ई सेवा व आधार केंद्र चालकांचे ९ मार्च रोजी मुंबईत धरणे आंदोलन


परभणी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।

राज्यातील महा ई सेवा व आधार सेवा केंद्र चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल महासंघ महा ई सेवा व आधार केंद्र यांच्या वतीने सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे राज्यव्यापी कामबंद धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमर पवार व राज्य सचिव विनोद तायडे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील महा ई सेवा व आधार केंद्र चालक शासनाच्या विविध डिजिटल सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवत असून शासनाच्या कार्यक्षमतेत मोठी भर घालत आहेत. या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र चालकांना थकीत कमिशन, नियमांमध्ये वारंवार बदल, कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र बंद करण्याची कारवाई, मासिक मानधन व सामाजिक सुरक्षेचा अभाव अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी दि. १२ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान तीन दिवसांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. तसेच मागण्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरीही मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.प्रमुख मागण्या- नवीन महा ई सेवा केंद्रांना तात्पुरती स्थगिती देऊन विद्यमान नियमांची पुनर्तपासणी करावी., आधार सेवांचे व इतर योजनांचे (लाडकी बहिण, पीएम किसान, पीक विमा आदी) थकीत कमिशन तात्काळ अदा करावे., आधार प्रकल्पासाठी घेतलेली ५० हजार रुपयांची ठेव रक्कम परत करावी., केंद्र चालकांना मासिक मानधन देऊन अर्धशासकीय दर्जा द्यावा.नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात विमा संरक्षण लागू करावे.केंद्र बंद करण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करावी. शासन समितीत संघटनेच्या प्रतिनिधीचा समावेश करावा. नाशिक व जळगाव जिल्ह्यात VLE केंद्र वाटपाबाबत चौकशी करावी. आधार नोंदीतील नाव, आडनाव व कागदपत्रांतील विसंगती संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात. दि. ९ मार्च रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या कालावधीत सेवा विस्कळीत झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande