
नांदेड, 25 फेब्रुवारी, (हिं.स.) स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे अनेक युवकांच्या व विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा टप्पा. परंतु महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडून दिले जाणारे बँक, रेल्वे, एलआयसी आदी परीक्षांचे प्रशिक्षण गेल्या सहा महिन्यांपासून असल्याने मराठवाड्यातील ओबीसी विद्यार्थ्यांची स्वप्ने अक्षरशः 'स्क्रीन' वर अडकून पडली आहेत. यापूर्वी खासगी शिकवणी संस्थांच्या माध्यमातून ऑफलाइन प्रशिक्षण दिले जात होते. अभ्यासिका, मार्गदर्शक प्राध्यापक, शंका निरसन सत्रे यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेची दिशा मिळत होती. मात्र यावर्षीपासून प्रशिक्षण पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'डिजिटल' सोयींचा दाखला देत हा बदल करण्यात आला असला, तरी ग्रामीण भागातील वास्तव वेगळे आहे. इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था आणि मोबाईल डेटाचा खर्च यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात सातत्य ठेवणे कठीण जात आहे. ओबीसी संघटनांनी प्रशासनाच्या अनास्थेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
सकल ओबीसी महामोर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे.'ही योजना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आहे; प्रशिक्षण ऑफलाइन स्वरूपात आणि पूर्ण विद्यावेतनासह तातडीने सुरू न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडे, 'महाज्योती' प्रशासनाने एसएससी व इतर परीक्षांचे प्रशिक्षण सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. बँक व रेल्वे भरतीच्या पूर्वपरीक्षा मार्चमध्ये होत असून एप्रिलपासून प्रशिक्षण सुरू होईल, असे सांगण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis