
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीवर विविध पक्षांचे १६ सदस्यांची निवडण्यात येणार आहेत, तसेच महिला व बाल कल्याण, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती, शहर सुधार, शाळा समिती, गलिच्छ वस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाज कल्याण या विविध समित्यांवरील नगरसेवकांमधून नियुक्ती केली जाणार आहे, त्यासाठी ५ मार्चला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समिती सभापती आणि सदस्यपदी वर्णी लागावी म्हणून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महापालिकेत भाजपचे ५७ आणि शिवसेना शिंदे गटाचे १३ असे एकूण ७० नगरसेवक महायुतीकडे आहेत. प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रमाणात १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार सर्वाधिक ५७ नगरसेवक असलेल्या भाजपकडून ८ सदस्य निवडले जातील. त्यापाठोपाठ ३३ नगरसेवक असलेल्या एमआयएमकडून ५ सदस्य, शिवसेनेचे १३ नगरसेवक असल्याने २, तर शिवसेना उद्धव बाळासाहेबठाकरे पक्षाचा १ सदस्य स्थायी समितीवर नेमला जाईल.
सर्वसाधारण सभेत गटनेत्यांकडून नावे कळविण्यात आल्यानंतरच सदस्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल. ५ मार्च रोजी होणाऱ्या विशेष सभेत शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि शहर सुधार समितीसाठी सदस्य निवडले जातील, व त्यातून सभापती निवडले जातील.स्थायी समितीच्या १६ सदस्याच्या निवड होईल ही निवड दोन वर्षासाठी असली तरी दरवर्षी ८ नगरसेवकांना स्थायी समितीचे सदस्यत्व सोडावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा ८ नवीन सदस्य निवडले जातील. त्यामुळे सुरुवातीच्या वर्षासाठी ८ सदस्यांना एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. त्यानंतर चिठ्ठया टाकून ८ जणांना सदस्यत्व सोडावे लागेल. तर १६ सदस्यांमधून एकाची स्थायी समिती सभापतीची निवड होईल.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis