
पुणे, 25 फेब्रुवारी (हिं.स.)शहराची जीवनरेखा असलेल्या मुठा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता ठोस आणि तांत्रिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. नदीत तरंगणारा प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बाटल्या, थर्माकोल आणि अन्य प्लास्टिक साहित्य अडविण्यासाठी नदीपात्रात ‘ट्रॅश बॅरिअर’ बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
बाबा भिडे पुलाजवळ एका खाजगी संस्थेने राबविलेल्या प्रयोगाला मिळालेल्या यशानंतर शहरातून वाहणाऱ्या सुमारे 44 किलोमीटरच्या मुठा नदीपात्रात विविध ठिकाणी असे बॅरिअर उभारण्याची योजना आखली जात आहे. यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांनी दिली. मुठा नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, चप्पल, शालेय पिशव्या, प्लास्टिक बाटल्या तसेच विविध घरगुती टाकाऊ वस्तू फेकल्या जात आहेत. धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली पूजासाहित्य, देवतांच्या मूर्ती आणि नारळ थेट नदीत विसर्जित केले जातात. हा सर्व कचरा पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे सरकत संपूर्ण नदी प्रदूषित करीत आहे. परिणामी नदीचे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या पर्यावरणाबाबतच्या सकारात्मक भूमिकेमुळे या उपक्रमासाठी आवश्यक निधीची तरतूद होईल, अशी पर्यावरणप्रेमींना अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु