
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी, (हिं.स) पक्षी अभ्यासक घडवण्यात नरहर कुरुंदकरांचा मोठा हातभार लाभला आहे. कुरुंदकरांनी मारुती चित्तमपल्ली यांना लेख कसे लिहायचे हे शिकवले. प्रारंभ, मध्य व शेवट कसा असावा हेही सांगितले. कुरुंदकर चित्तमपल्ली यांना चालते बोलते विद्यापीठ म्हणत. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते माणिक पुरी यांनी केले. ते डॅा. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मायमराठी गौरव महोत्सवात 'प्राचार्य कुरुंदकर' व्याख्यानमालेत 'सृष्टी, पक्षी आणि साहित्य' या विषयावर मराठी विभागाच्या सभागृहात बोलत होते. यावेळी विचारमंचावर तहसीलदार के. के.भदाणे, नायब तहसीलदार धवणे, विभागप्रमुख डॉ. दासू वैद्य, डाॅ. कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले, गो.नी. दांडेकर हेही चित्तमपल्लीना मार्गदर्शन करीत. आपल्या आयुष्याची सुरुवातच चिमण्यांपासून होते. सुगरण, राजहंस, कावळा, रंगीत करकोचा, हरियाल, कोतवाल, चोर कावळा, छोटा चोरकावळा, तांबट, इंडियन रायडर, पानमोर, तनमोर, मूकनामर, उघड्या चोचीचा करकोचा, मिलखाई, लार्क, शिंघी घुबड, सिंजिर आदी पक्ष्यांची त्यांनी पीपीटीद्वारे सविस्तर माहिती दिली. पक्ष्यांचा आकार, रंग, डोळे, आवाज, बसण्याची शैली, त्यांचे खाद्य, त्यांची जीवनशैली, पक्ष्यांचे अनुभवविश्व, पक्ष्यांचा शेतकऱ्यांना फायदा आदींवर त्यांनी प्रकाश टाकला. शेवटी त्यांनी पक्ष्यांची नऊ मिनिटांची शाॅर्टफिल्मही दाखविली. तहसीलदार के.के.भदाणे यांनी या कार्यक्रमाचा मला खूप अभिमान आहे, असे गौरवोद्गार आपल्या भावना व्यक्त करताना काढले. मराठी भाषेच्या इतिहासावर व बोलींचा त्यांनी संक्षिप्त धावता आढावा घेतला. तर डाॅ.कैलास अंभुरेही यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक करताना डॉ.दासू वैद्य म्हणाले, मराठी विभागाला एक मोठी परंपरा आहे. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा मराठी व अर्थशास्त्र विभाग सुरू झाले. या विभागातील यू.म.पठाण, डॅा. गंगाधर पानतावणे, डॅा. प्रभाकर मांडे या तीन प्राध्यापकांना पद्मश्री पुरस्काराने गौरवान्वित आले आहे. व्याख्यानमालेचा जागर व्हावा यासाठी ही व्याख्यानमाला आहे. विचारधारा कोणतीही असो त्याची विचारांची बैठक पक्की असावी. तरुण वर्गाचा ओढा नरहर कुरुंदकरांच्या साहित्याकडे वाढला आहे. कुरुंदकर आंतरविद्याशाखीय अभ्यासक होते. यावेळी डाॅ. कोंडबा हाटकर यांच्या 'विवंचना' व बापूराव वऱ्हाडे यांच्या 'शोध कादंबरी मीमांसा' या दोन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. नीलिमा जोग, आठल्ये मॅडम, श्रीकांत उमरीकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis