नवीन गव्हाचे बाजार समितीत आगमन; गव्हाचे दर तेजीत राहण्याची शक्यता
अमरावती, 25 फेब्रुवारी, (हिं.स.) उन्हाळ्याची चाहूल लागताच कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या गहू आणि ज्वारीची आवक वाढू लागली आहे. यंदा मान्सूनमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहिला. तसेच सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा
नवीन गव्हाचे बाजार समितीत आगमन   निर्यातीच्या पार्श्वभूमीवर गव्हाचे दर तेजीत राहण्याची शक्यता


अमरावती, 25 फेब्रुवारी, (हिं.स.) उन्हाळ्याची चाहूल लागताच कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या गहू आणि ज्वारीची आवक वाढू लागली आहे. यंदा मान्सूनमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहिला. तसेच सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने रब्बी हंगामातील गव्हाला पोषक वातावरण मिळाले. परिणामी, जिल्ह्यात गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, सुधारित बियाणे आणि योग्य वेळी खत व्यवस्थापन केल्याने हेक्टरी उत्पादनात सरासरी ५ ते ७ क्विंटलने वाढ झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी पिक व्यवस्थापनात घेतलेली दक्षता आणि हवामानाची साथ यामुळे गव्हाची प्रतही उत्तम असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

सध्या बाजार समितीत गव्हाची प्रतवारीनुसार आवक होत आहे. नवीन गव्हाला प्रति क्विंटल २,८०० ते ३,५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. वाणानुसार दरात फरक दिसून येत आहे. लोकवन, शस्वती, सिहोर या वाणांना विशेष मागणी असून, चांगल्या प्रतीचा व फिल्टर केलेला गहू बाजारात ५०० ते ७०० रुपयांपर्यंत अधिक दराने विकला जात आहे. आवक वाढत जाईल तसे दरात काही प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, रशिया–युक्रेन युद्ध आणि जागतिक बाजारातील वाढती मागणी यामुळे गव्हाच्या दरावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असेही जाणकारांचे मत आहे. केंद्र सरकारने गहू निर्यातीला दिलेल्या मंजुरीमुळे देशांतर्गत बाजारात दर स्थिर किंवा तेजीत राहण्यास आधार मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला समाधानकारक मोबदला मिळण्याची अपेक्षा आहे.

गव्हाच्या तुलनेत ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात काहीशी घट झाली आहे. मका आणि इतर नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने ज्वारीचे उत्पादन घटले आहे. परिणामी, नव्या ज्वारीला प्रति क्विंटल ४,००० ते ५,५०० रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“यंदा गव्हाची प्रत उत्तम आहे. बाजारात आवक आता सुरू झाली आहे. जागतिक मागणी आणि निर्यातीच्या शक्यतेमुळे दर समाधानकारक राहतील,” असे व्यापारी सदानंद राऊत यांनी सांगितले. एकूणच, यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande