
लातूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती व संस्थांचा सन्मान विविध पुरस्कार देऊन केला जातो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रीय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. हे पुरस्कार माननीय राज्यपाल यांच्या शुभहस्ते प्रदान केले जातात.
यापूर्वी या पुरस्कारांसाठी ऑफलाईन पद्धतीने चार प्रतींमध्ये प्रस्ताव सादर करावे लागत होते. यामुळे प्रस्ताव तयार करण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. तसेच प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पारंपरिक पद्धतीच्या अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने पुरस्कार प्रस्ताव प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र ऑनलाइन संगणक प्रणाली विकसित केली आहे.
ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in वर 'कृषी पुरस्कार' टॅबमध्ये उपलब्ध आहे. या डिजिटल प्रणालीद्वारे पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढेल आणि प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक मजबूत होईल.
शेतकऱ्यांना होणारे प्रमुख फायदे –
घरबसल्या ऑनलाइन अर्ज सादर करता येणार.
ऑफलाइन चार प्रती प्रस्ताव तयार करण्याचा वेळ व खर्च वाचणार.
एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची गरज नाही.
अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे याची माहिती सहज उपलब्ध होणार.
छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्च कमी होऊन आर्थिक भार कमी होणार.
इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गट यांना सन २०२५ पासूनचे विविध कृषी पुरस्कारांसाठी अर्ज ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे सादर करण्याचे आवाहन कृषि आयुक्त यांनी केले आहे. तरी इच्छुकांनी तात्काळ अर्ज सादर करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी कळविले आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis