
बीड, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। स्वर्गीय सुदाम काका भोंडवे यांनी उभ्या केलेल्या दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान सोनदरा गुरुकुल, डोमरी या शिक्षण चळवळीशी सुरुवातीपासूनच जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे. त्यांच्या कार्यातून उभ्या राहिलेल्या गुरुकुलच्या वाटचालीतील अनेक आठवणी ‘शिक्षणाच्या ओव्या’ या पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा अनुभवण्याचा योग आला. अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली.
आमदार सुरेश धस म्हणाले की, ३९ वर्षांपूर्वी भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेतून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी स्वर्गीय सुदामकाका भोंडवे यांनी सोनदरा गुरुकुल ची स्थापना केली. डोमरीच्या माळरानावर सुरू झालेल्या या शिक्षण चळवळीमुळे आज हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत आपले नाव उज्ज्वल करत आहेत.
गुरुकुलाचा झालेला प्रवास, आलेले अनुभव आणि केलेला विचार याविषयी सुदाम काकांनी लिहिलेले लेख ‘शिक्षणाच्या ओव्या’ या पुस्तकाच्या रूपाने राजहंस प्रकाशन यांनी प्रकाशित केले असून, या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती .
यावेळी गिरीश प्रभुणे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते), गिरीश कुलकर्णी (स्नेहालय), गिरीशराव बापट (संचालक, ज्ञान प्रबोधिनी), विवेकजी सावंत (संस्थापक मार्गदर्शक, एम.के.सी.एल.), हणमंतराव गायकवाड (संस्थापक अध्यक्ष, बी.व्ही.जी. इंडस्ट्रिज) तसेच रवींद्रजी वंजारवाडकर (मा. पुणे महानगर संघचालक, रा. स्व. संघ) तसेच अनेक लेखक, विद्यार्थी नागरीक उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis