
लातूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर सध्या बुलेट आणि इतर दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये बदल करून 'इंदोरी फटाक्यां'सारखे कानठळ्या बसवणारे आवाज काढण्याचे फॅड वाढले आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक, वृद्ध आणि रुग्णांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत अहमदपूर उपविभागाचे पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट इशारा दिला आहे की, अहमदपूर, वाढवणा, किनगाव आणि जळकोट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अशा बेशिस्त वाहनधारकांवर केवळ दंड करून न थांबता, आता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी माहिती दिली की, अनेक तरुण आपल्या बुलेट आणि इतर दुचाकींना मॉडिफाय करून त्यातून विचित्र आणि मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवतात. यापूर्वी अशा वाहनधारकांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या आणि दंडही आकारला होता, मात्र तरीही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता मोटार वाहन कायदा आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, आता केवळ दुचाकी चालवणारा तरुणच नव्हे, तर ज्या गॅरेजमध्ये असे सायलेन्सर बदलून दिले जातात, त्या गॅरेज मालकावर आणि संबंधित कामगारावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
या कारवाईत अशा मॉडिफाय केलेल्या मोटारसायकल जागीच जप्त केल्या जातील आणि मोठा दंडही वसूल केला जाईल. अहमदपूर शहरासह संपूर्ण उपविभागात शांतता राखण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन आता रस्त्यावर उतरले आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असेही रायबोले यांनी ठणकावून सांगितले आहे. नागरिकांनी आणि विशेषतः पालकांनी आपल्या पाल्यांच्या दुचाकींकडे लक्ष द्यावे, तसेच गॅरेज मालकांनी बेकायदेशीर बदलांना प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या कडक निर्णयामुळे परिसरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis