
पालघर, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। वसई-विरार शहरात पावसाळ्यातील पूरस्थिती नियंत्रणासाठी होल्डींग पाँण्ड उभारण्यासाठी चालना मिळाली आहे. भाजपाचे आमदार राजन नाईक यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर, राज्य सरकारने वसई-विरार महापालिकेला होल्डींग पाँण्डसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर पूर स्थितीवर नियंत्रणासाठी आयआयटी मुंबई व निरी संस्थेने अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार शहरात होल्डींग पाँण्ड उभारण्यासाठी ११७ कोटी ९२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या होल्डींग पाँण्डचे काम सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्याची मागणी आमदार राजन नाईक यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ३ सप्टेंबर २०२५ रोजी केली होती. त्यातसेच त्याबाबत पाठपुरावा केला होता.
आमदार राजन नाईक यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या सूचनेनुसार पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी वसई-विरार महापालिकेच्या शहर अभियंत्यांना होल्डींग पाँण्डबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रूीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एनडीएमए) मार्गदर्शक सूचनेनुसार प्रस्ताव तयार करून तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वसई-विरार महापालिका क्षेत्रात होल्डींग पाँण्ड उभारण्यासाठी चालना मिळाली आहे. अशी माहिती भाजपा जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL