कुडूस खरेदी केंद्रावर ३ हजार क्विंटलहून अधिक भाताची खरेदी; ६९७ शेतकऱ्यांचा सहभाग
पालघर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। आदिवासी विकास महामंडळाकडून वाडा तालुक्यातील कुडूस येथे नुकतेच धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रावर आतापर्यंत ३ हजार २९४ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीसाठी ६९७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज स
कुडूस खरेदी केंद्रावर ३ हजार क्विंटलहून अधिक भाताची खरेदी; ६९७ शेतकऱ्यांचा सहभाग


पालघर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।

आदिवासी विकास महामंडळाकडून वाडा तालुक्यातील कुडूस येथे नुकतेच धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रावर आतापर्यंत ३ हजार २९४ क्विंटल भाताची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीसाठी ६९७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले असल्याची माहिती केंद्रप्रमुख प्रदीप जाधव यांनी दिली.

यापूर्वी कुडूस येथे खरेदी केंद्र नसल्याने परिसरातील ५२ गावांतील शेतकऱ्यांना १० ते १५ किलोमीटर अंतरावरील पासोडी पाडा येथे जावे लागत होते. या समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वाडा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, शरद चौधरी, वैभव पष्टे, प्रकाश शेटे व परशराम चौधरी यांनी लक्ष वेधल्यानंतर आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा माजी आमदार सुनील भसारा यांनी विशेष प्रयत्न करून कुडूस येथील केंद्राला मंजुरी मिळवून दिली.

आदिवासी विकास महामंडळामार्फत वाडा तालुक्यात गुहीर, कळंभे, गोहे, पोशेरी, परळी, सारशी, कुडूस, कोनसई आणि मानिवली अशा नऊ केंद्रांवर भात खरेदी केली जाते. कुडूस येथील केंद्र यावर्षीपासून सुरू झाले असून, शेतकऱ्यांचा येथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक पातळीवरच खरेदी केंद्र उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च आणि श्रमांची बचत होत असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande