रासेगावच्या सरपंचासह पती लाच घेताना रंगेहाथ ताब्यात
Rasegaon Sarpanch along with husband bribed
रासेगावच्या सरपंचासह पती लाच घेताना रंगेहाथ ताब्यात


दिंडोरी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।

रासेगाव व देहरेवाडी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील ग्रामपंचायतीच्या अविश्वास ठराव प्रकरणात 15 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सरपंच मंदा विठ्ठल बेडकुळे (वय 35) व त्यांचे पती विठ्ठल पांडुरंग बेडकुळे (वय 39) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे रासेगाव व देहरेवाडी गावचे उपसरपंच असून, त्यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी संशयितांनी लाचेची मागणी केली होती. सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यांपैकी 15 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष तक्रारदारांनी 15 हजार रुपयांची रक्कम दिली असता, त्यापैकी 14 हजार रुपये सरपंच मंदा विठ्ठल बेडकुळे यांनी, तर एक हजार रुपये त्यांचे पती विठ्ठल पांडुरंग बेडकुळे यांनी स्वीकारले. लाच स्वीकारताच सापळा पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सापळा पथकामध्ये पोलीस हवालदार विनोद चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे यांचा सहभाग होता. या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांनी मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande