
मुंबई, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। मुंबईतील मालाड परिसरातून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फळांवर उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे ‘राटोल’ हे विषारी औषध लावून ती फळे नागरिकांना विकली जात असल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी दोन फळ विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे हा प्रकार उघड झाला आणि त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक फळ विक्रेता रात्रीच्या वेळी फळांवर उंदीर मारण्याची क्रीम लावताना दिसत होता. उंदरांपासून फळांचे संरक्षण करण्यासाठी हा उपाय केल्याचे सांगितले जात असले, तरी हीच फळे दुसऱ्या दिवशी ग्राहकांना विकली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विषारी औषध लावलेली फळे खाल्ल्यास उलट्या, पोटदुखी, तीव्र विषबाधा, तसेच यकृत निकामी होण्यासारखे गंभीर परिणाम संभवू शकतात, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
ही घटना उघड झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. दरम्यान, मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले. मनसे नेते कुणाल साळुंके यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत संबंधित विक्रेत्याला जाब विचारला. यावेळी कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात त्या विक्रेत्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर प्रकरण अधिकच चिघळले.
यानंतर मालाड पोलीस ठाण्यात या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी तात्काळ कारवाई करत दोन फळ विक्रेत्यांना ताब्यात घेतले. मनोज कुमार केसरवाणी आणि बिपीन केसरवाणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी उंदीर फळे खात असल्यामुळे त्यावर औषध लावत असल्याची कबुली दिली आहे. या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५, २७४, २७५ आणि २८६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनेही तत्काळ कारवाई केली. संबंधित विक्रेत्याचे बेकायदेशीर दुकान जमीनदोस्त करण्यात आले आहे. तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन संशयित फळांचे नमुने जप्त केले असून तपास सुरू आहे. या घटनेनंतर मालाड पोलिसांनी परिसरातील इतर फेरीवाल्यांचीही तपासणी आणि चौकशी मोहीम हाती घेतली आहे.
या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अन्नविक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अधिक कठोर नियंत्रण आणि नियमित तपासणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवू, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule