
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। तहसील कार्यालय, माजलगाव येथे मतदारसंघातील विविध विषयांबाबत आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीमध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत सुरू व प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच माजलगाव शहरातील आठवडी बाजारासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणे, नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेअंतर्गत STP प्रकल्पासाठी आवश्यक जागेची उपलब्धता, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू पुरवठा, ग्रामीण रस्त्यांचे सीमांकन व अतिक्रमण विषयक कार्यवाही, वडवणी येथील बसस्थानकासाठी अत्यावश्यक जागा उपलब्ध करून देणे तसेच माजलगाव येथे अल्पसंख्याक समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारणी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत प्राधान्याने मागणी असणाऱ्या गावांची यादी तयार करून क्लस्टर सादर करण्याच्या सूचना दिल्या तसेच माजलगाव शहरातील आठवडी बाजाराच्या जागेच्या अनुषंगाने जागेसाठीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचित केले.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीसाठी आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी जागेची निश्चिती करून परिपूर्ण प्रस्ताव वेळेचा विलंब न करता तयार करून पुढील कार्यवाही साठी पाठवावे. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याच्या दृष्टीने लिलाव झालेल्या वाळू घाटांवरून मोफत वाळू देण्यास सुरुवात करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा असे निर्देश दिले.
ग्रामीण रस्त्यांचे सीमांकन व अतिक्रमण याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.या रस्त्यांबाबत आदेश पारित केल्यानंतर देखील रस्ते खुले केले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या,या अनुषंगाने प्रलंबित प्रकरणातील शेतकऱ्यांना तातडीने रस्ते खुले करून देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या व आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही गतीमान करण्याच्या सूचना दिल्या. मतदारसंघातील विकासकामांना अपेक्षित वेग देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis