
रियाध, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।सौदी अरेबियाने पोल्ट्री आणि टेबल अंडी (खाण्यायोग्य अंडी) यांच्या आयात नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या निर्णयानुसार ४० देशांमधून होणाऱ्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, तर १६ देशांतील काही राज्ये आणि शहरांमधून आयातीवर आंशिक निर्बंध लावण्यात आले आहेत. बर्ड फ्लू (पक्षी इन्फ्लूएंझा) सारख्या आजारांचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सौदी फूड अँड ड्रग प्राधिकरण यांनी जाहीर केला आहे. यामागचा उद्देश सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे आणि देशातील अन्नसुरक्षा अधिक मजबूत करणे हा आहे.
प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, प्रतिबंधित देशांची यादी जागतिक आरोग्यस्थितीनुसार वेळोवेळी अद्ययावत केली जाईल. काही देशांवर २००४ पासूनच बंदी लागू आहे, तर काही देशांचा समावेश जोखमीच्या आढाव्यानंतर नंतर करण्यात आला आहे.मुख्य चिंता बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाबाबत आहे. जागतिक पातळीवरील रोगस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून त्यानुसार नियमांमध्ये बदल केले जातात. पूर्णपणे बंदी घातलेले ४० देशांमध्ये अफगाणिस्तान, अझरबैजान, जर्मनी,इंडोनेशिया, इराण, बोस्निया आणि हर्झेगोविना, बल्गेरिया, बांगलादेश, तैवान, जिबूती, दक्षिण आफ्रिका, चीन, इराक, घाना, पॅलेस्टाईन, व्हिएतनाम, कंबोडिया, कझाकिस्ता, कॅमेरून, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, लाओस, लिबिया, म्यानमार, युनायटेड किंग्डम, इजिप्त, मेक्सिको, मंगोलिया, नेपाळ, नायजर, नायजेरिया, भारत, हाँगकाँग, जपान, बुर्किना फासो, सुदान, सर्बिया, स्लोव्हेनिया, आयव्हरी कोस्ट, माँटेनेग्रो यांचा समावेश आहे.
तर पूर्ण बंदीव्यतिरिक्त आंशिक निर्बंध असलेल्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इटली, बेल्जियम, भूतान, पोलंड, टोगो, डेन्मार्क, रोमानिया, झिंबाब्वे, फ्रान्स, फिलिपाईन्स, कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो यांचा समावेश आहे. या देशांमध्ये संपूर्ण देशावर नव्हे, तर फक्त काही निश्चित प्रदेशांमधून आयात थांबवण्यात आली आहे. हा निर्णयही बर्ड फ्लू आणि इतर पशुरोगांचा धोका लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.
प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, पुरेशा प्रमाणात हीट-ट्रीटमेंट केलेल्या पोल्ट्री उत्पादनांना तात्पुरत्या बंदीतून सूट दिली जाऊ शकते. मात्र त्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे: यामध्ये उत्पादनाने सर्व निर्धारित आरोग्य मानके आणि नियमांचे पालन केलेले असावे.त्यासोबत वैध आरोग्य प्रमाणपत्र असावे. हे प्रमाणपत्र निर्यात करणाऱ्या देशाच्या अधिकृत सरकारी संस्थेकडून जारी केलेले असावे.प्रक्रिया दरम्यान बर्ड फ्लू किंवा न्यूकॅसल रोगाचा विषाणू पूर्णपणे नष्ट झाल्याचे प्रमाणित असावे. उत्पादन मान्यताप्राप्त आणि अधिकृत कारखान्यातून तयार झालेले असावे. हा निर्णय जागतिक आरोग्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर घेतला असून, भविष्यात परिस्थितीनुसार यात बदल होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode