वसई–विरार मनपा स्थायी समिती सभापतीपदाची निवड ४ मार्चला; हितेंद्र ठाकूरांच्या निर्णयाकडे लक्ष
पालघर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। वसई–विरार महापालिकेतील महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडीकडे लागले आहे. स्थायी समिती सभापती निवडीसाठी ४ मार्च रोजी बैठक होणार असू
वसई–विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवड ४ मार्चला; हितेंद्र ठाकूरांच्या निर्णयाकडे लक्ष


पालघर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।

वसई–विरार महापालिकेतील महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडीकडे लागले आहे. स्थायी समिती सभापती निवडीसाठी ४ मार्च रोजी बैठक होणार असून, या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून डॉ. इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी ही नियुक्ती केली आहे.

वसई–विरार महापालिकेत गेल्या दहा वर्षांत स्थायी समिती सभापतीपद बहुजन विकास आघाडीकडेच राहिले आहे. आतापर्यंत आठ नगरसेवकांना या पदाची संधी मिळाली असून, जितेंद्र शहा आणि नितीन राऊत यांना प्रत्येकी दोन वर्षे सभापतीपद भूषवता आले. सध्या महापौरपदावर अजीव पाटील असून, उपमहापौर म्हणून मार्शल लोपीस कार्यरत आहेत. त्यामुळे यावेळी वसईतील नगरसेवकाला सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थायी समितीचे १६ सदस्य २० फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत निवडण्यात आले. बहुजन विकास आघाडीकडून प्रवीण शेट्टी, नरेंद्र पाटील, लॉरेल डायस, पंकज पाटोल, रंजना थालेकर, आलमगार डायर, प्रफुल पाटील, चंद्रशेखर धुरी, सुनील आचोळकर आणि स्वप्नील कोळे यांची नावे देण्यात आली आहेत. तर महायुतीकडून सहा नगरसेवकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

बहुजन विकास आघाडीकडे बहुमत असल्याने सभापतीपद त्यांच्याकडेच जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या पदासाठी माजी महापौर प्रवीण शेट्टी यांचे नाव आघाडीवर असून, मात्र अंतिम निर्णय हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande